वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या अनोळखी स्त्रिया जेव्हा सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल म्हणजे 'झिम्मा'. या वेगळ्या स्वभावाच्या महिला प्रवाशांची जेव्हा 'इंग्लंड टूर' सुरु होते तेव्हा त्यांच्यात घडणारी मज्जामस्ती, खटके, एकमेकींविषयीची काळजी, वेळोवेळी दिलेले मानसिक धैर्य, नव्याने निर्माण झालेली नाती असा सुंदर प्रवास 'झिम्मा'मध्ये पाहायला मिळणार आहेत.
असे म्हणतात, 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो...' त्याची स्वतःशीच नव्याने ओळख होते. आयुष्य मनमुराद जगण्यासाठीची ही शिकवण देणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‘झिम्मा’ची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची 'झिम्मा'विषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' या चित्रपटाचा ट्रेलर हसतखेळवत बरंच काही सांगून जातो. आयुष्य जगण्यातली मजा आपण आपल्याही नकळत हरवून बसतो, हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. 'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते, त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा चित्रपट आहे. महिलांनीच नाही तर प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा धमाल कौटुंबिक चित्रपट आहे.