महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे ‘धुमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयात पदार्पण करत आहेत. रोमान्स आणि अॅक्शनचे मिश्रण असलेल्या ‘धुमस’च्या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गरुड फिल्म्स निर्मित ‘धुमस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.
आजच्या तरुणाईची कथा सांगणाऱ्या ‘धुमस’च्या संवाद, गीते आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चित्रपटात असलेली गोपीचंद पडळकर - साक्षी चौधरी आणि रोहन पाटील - कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमँटीक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालते. तर वास्तव जीवनात नेते असलेले उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रूपाने सुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहेत. याशिवाय विशाल निकम, भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ‘धुमस’ मध्ये आहेत.