मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे चित्रपटसृष्टीला एक प्रकारे कळा आली होती. शुटिंग थांबली, रिलीज रोखण्यात आले, थिएटर्सवर अनेक निर्बंध यामुळे मराठी सिनेमाला वाईट दिवस आले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर थिएटर्स काही अटी शर्थीवर पुन्हा उघडली आणि पांडू आणि झिम्मा हे दोन महत्त्वाचे मराठी सिनेमे झळकले. विजू माने दिग्दर्शित 'पांडू' उत्तम कामगिरी करीत असून हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'लाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
19 नोव्हेबर रोजी 'झिम्मा' रिलीज झाला होता. सुरूवातीला याला यश कसे मिळेल अशी निर्मात्यांना धास्ती वाटत होती. मात्र प्रेक्षकांना झिम्मा आवडला. आता या सिनेमाचे चार आठवडे पार झाले आहेत आणि अनेक थिएटर्समध्ये अजूनही प्रेक्षक रांगा लावताना दिसत आहेत.