महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यानंतर प्रथमतः बॉलिवूड चित्रपटांनी प्रदर्शनासाठी भाऊगर्दी केली. अनेक मराठी निर्मात्यांनी सबुरीचा भूमिका घेत आपले चित्रपट नंतर रिलीज करण्याचे ठरविले. परंतु दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ हा सिनेमा बॉलिवूडशी टक्कर देत १२ नोव्हेंबर ला सर्वत्र प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला हा चित्रपट सिनेमघरात बॉलिवूड सिनेमांची मक्तेदारी असतानादेखील तिसऱ्या आठवड्यात थाटाने उभा आहे. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या पहिल्या मराठी चित्रपटाला प्रेक्षकवर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
या चित्रपटाला विदर्भातून विशेष प्रेम मिळत आहे. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिथे मराठी चित्रपट कमी प्रमाणात लागतात तेथेदेखील जयंती तग धरून बसला आहे. त्याप्रमाणेच मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरातदेखील "जयंती" दिमाखात साजरी होत आहे. आता या सिनेमाची ख्याती सातासमुद्रापार देखील पसरली आहे. ऑस्ट्रेलिया, लंडन, कॅनडा आणि दुबई या देशातील सिनेमघरात जयंती हा सिनेमा दाखवला जाणार आहे. प्रेक्षकवर्ग खऱ्या अर्थाने जगभरात जयंती साजरी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.