मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती संजय दत्तसोबत 'प्रस्थानम' चित्रपटात दिसणार आहे. तर, 'संजू' चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बॉलिवूडसोबतच ती नेटफ्लिक्सच्या एका सीरिजमध्येही झळकणार आहे. 'मस्का' असे या आगामी सीरिजचे नाव आहे.
'नेटफ्लिक्स'ने 'मस्का' सीरिजच्या कलाकारांची नावे जाहीर केली आहे. मनीषा कोईरालासोबत सिंगर शर्ली सेतिया, निकिता दत्ता आणि प्रीत कमानी यांचीही वर्णी लागली आहे. नीरज अधवाणी हे या सीरिजचे दिग्दर्शन करत आहेत. सेहर ऐली लतीफ आणि म्यूटेंट फिल्म्सच्या शिवानी सरन हे या सीरिजची निर्मिती करत आहेत.