मुंबई - सध्या मुख्य धारेतील आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टींमध्ये दरी कमी होताना दिसतेय. खासकरून दाक्षिणात्य स्टार्स, हिंदीसकट, इतर भाषिक चित्रपटांचा भाग होताना दिसताहेत. प्रादेशिक चित्रपटांतूनही कलाकारांची देवाणघेवाण सुरूच आहे. अनेक मराठी कलाकारांनी दाक्षिणात्य सिनेमांतून भूमिका साकारल्या आहेत. आता एक दाक्षिणात्य अभिनेत्री मराठी चित्रपट करीत आहे. मल्याळम 'द ग्रेट इंडियन किचन' या यशस्वी चित्रपटानंतर अभिनेत्री निमिषा सजयन ‘हवाहवाई’ हा मराठी चित्रपट करतेय.
महेश टिळेकर दिग्दर्शित ‘हवाहवाई’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. 'द ग्रेट इंडियन किचन' या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अक्षयकुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्या आधीच्या चित्रपटांमधून मराठीत पदार्पण केलं होतं. त्याशिवाय "बाहुबली" या चित्रपटाचे कॅमेरामन सेन्थील कुमार यांना पहिली संधी महेश टिळेकर यांनी त्यांच्या "आधार" चित्रपटाद्वारे दिली होती.
मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. "द ग्रेट इंडियन किचन" या चित्रपटातील निमिषा सजयनचा अभिनय आवडल्याने महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याला निमिषाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या चित्रपटासह निमिषाच्या नायट्टू, मालिक या चित्रपटांतील अभिनयाचं देखील कौतुक झालं आहे.