मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कबुली दिली आहे. त्यामुळे आता दोघांच्या लग्नाच्या चर्चांनादेखील उधाण आले आहे. अर्जुन कपूरच्या वाढदिवशी मलायकाने अर्जुनसोबतचा फोटो शेअर करून त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते. आता त्याच्यासोबतच्या नात्यावरही ती भरभरुन बोलली आहे.
मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघेही आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. मलायकाच्या आयुष्यात आता अर्जुनच्या रुपाने पुन्हा प्रेम फुलले आहे. तिने याबाबत एका माध्यमाशी बोलताना म्हटले की, 'प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात दुसरी संधी मिळणं गरजेचं आहे. भारतात आजही महिलांनी दुसऱ्यांदा एखाद्या व्यक्तीशी नाते जोडले, तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मात्र, महिलांना सुद्धा दुसऱ्यांदा प्रेम करण्याचा अधिकार आहे. याकडे समाजानेही सकारात्मक नजरेने पाहायला हवे'.
वयातील अंतरावरही व्यक्त केलं स्पष्ट मत-
अर्जुन आणि मलायकातील वयाचे अंतर जास्त असल्याने दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र, मलायकाने यावरही आपले स्पष्ट मत व्यक्त केले होते. ती म्हणाली होती, की 'मुलीपेक्षा मुलाचे वय जास्त असेल तर समाजाला काहीही फरक पडत नाही. मात्र, तेच जर स्त्रीच्या बाबतीत असेल, तिचे वय जास्त असेल, तर त्यावर प्रश्नचिन्हे निर्माण केली जातात.'
सोशल मीडियावर लाखो फॅन्स -
मलायका नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. त्यामुळे कधी कधी तिला ट्रोल केलं जातं. मात्र, मलायका ट्रोलिंगकडे लक्ष न देता आपले काम करत राहते.
अशी केली होती करिअरची सुरुवात -
मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली होती. तिने 'क्लब एम टीव्ही', 'लव्ह लाईन' आणि 'स्टाईल चेक' यांसारखे कार्यक्रम केले होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिची ओळख 'छैय्या छैय्या' गाण्यामुळे निर्माण झाली होती. या गाण्यासोबतच तिचे 'गुर नाल इश्क मिठा', 'माही वे', 'काल धमाल' आणि 'मुन्नी बदनाम' हे आयटम नंबरदेखील लोकप्रिय झाले होते.