हे वर्ष सरता सरता सलमान खान अभिनित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम’ प्रदर्शित झाला. आता नव्या वर्षात महेश मांजरेकर घेऊन येताहेत एका अनोख्या नावाचा चित्रपट, ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’. आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखीत महेश मांजरेकर यांनी अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटाचं सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक होतंय आणि आता नव्या वर्षात ते एक नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं वेगळं शीर्षक असलेला हा चित्रपट २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. चित्रपटाच्या पोस्टरनंतर नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार, कोणती भूमिका साकारणार, याकडे रसिक प्रेक्षकांच्या नजरा आहेत.