कसलेला कलाकार यशापयशाची पर्वा करीत नसतो. काही कलाकारांना यश खूप उशिरा मिळते. आजवर पूर्ण हयात अभिनयात घालवल्यानंतर कोकणच्या भूमीत आकाराला आलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं माधव अभ्यंकरांना अण्णा नाईकच्या रूपात अपार लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत जबरदस्त वाढ झाली आहे. माधव अभ्यंकर आता एका वेगळ्या रूपात आपल्या चाहत्यांना भेटायला येणार आहेत. 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटात माधव अभ्यंकर काम करीत असून त्यांचा लक्षवेधी लूक सध्या चर्चेत आहे.
चित्रपटांप्रमाणेच काही मालिका आणि नाटकंदेखील कलाकारांना सर्वदूर पोहोचवण्याचं काम करत असतात. दररोज घरोघरी पोहोचणाऱ्या मालिकेतील एखाद्या कलाकारानं साकारलेलं कॅरेक्टर रसिकांच्या पसंतीस उतरलं की मग तो कलाकार त्या व्यक्तिरेखेच्याच नावानं जनमानसात ओळखला जातो. ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. ते आता बऱ्याच चित्रपटांतून काम करीत असून त्यातीलच एक म्हणजे
‘गुल्हर'.
या चित्रपटाची कथा धनगर समाजातील एका ११ वर्षांच्या लहान मुलावर आधारलेली आहे. यात माधव अभ्यंकर यांनी साकारलेलं पात्र अत्यंत महत्त्वाचं असल्यानं त्यांना धनगरी लुक देण्यात आला आहे. डोक्याला गुलाबी फेटा, पांढरा सदरा, धोतर, हातात घुंगरू लावलेली काठी, उजव्या हातात कडं, डाव्या खांद्यावर उपरणं, गळयात तावीज, झुपकेदार मिशा, पायात वहाणा आणि हळदीनं भरलेला मळवट असं काहीसं माधव अभ्यंकरांचं रुपडं 'गुल्हर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात माधव अभ्यंकर नेमके कोणत्या भूमिकेत झळकणार आहेत हे अद्याप उघड करण्यात आलेलं नाही.