आंध्र प्रदेशातील राजकारण एनटीआर यांच्या काळात अनेक बदलांचे साक्षीदार ठरले. त्यांनी सिनेमा जगत आणि राजकारणाचा असा काही स्वाद चाखला की त्यांच्यासम तेच. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सिनेजगताला अलविदा केले होते पण संपर्क कायम होता.
एनटीआर या वेगळ्या व्यक्तीमत्वाने आंध्रच्या जनतेवर गारुढ केले होते. तेलुगु भाषिकांसाठी त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. यानंतर केवळ ९ महिन्यातच त्यांचा पक्ष सत्तास्थानी पोहोचून इतिहास रचला. त्यांच्या पक्षाच्या नव्या अस्तित्वामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अधोरेखीत झाले. त्यांनी संपूर्ण देशाला तेलुगु समुदायाकडे सन्मानाने पाहायला भाग पाडले.
एनटीआर यांनी पडद्यावर साकारलेल्या पौराणिक भूमिका त्यांची राजकिय कारकिर्द बहरण्यासाठी उपयुक्त ठरल्या. तब्बल १७ चित्रपटतून त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. गंमत म्हणजे मुख्यमंत्री असतानाही काही वेळा ते पौराणिक वेशभूषा परिधान करत असत. त्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आणि आदर होता.
आंध्रच्या किनारपट्टीला बसलेल्या जबरदस्त वादळाच्या तडाख्याने एनटीआर यांचे जीवन बदलून गेले. यात नुकसान झालेल्या परिसराला त्यांनी भेट दिली आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांना उमगले. खुद्द श्रीकृष्णच आपल्या मदतीला धावून आल्याची भावना यावेळी वादळात नुकसान झालेल्या जनतेची होती. त्यानंतर एनटीआर यांनी जनतेला मदतीचे आवाहन केले आणि त्यांना प्रचंड उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी तर आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने त्यांच्या झोळीत मदत म्हणून दिले. विशेष म्हणजे ५ लाख घरांची बांधणी त्यांनी या मदतीतून केली. या घटनेने त्यांची संपूर्ण राज्यभर वेगळी प्रतिमा निर्माण झाली, याचा लाभ त्यांना राजकारणात झाला. जनतेने त्यांच्या तेलुगु देसम पक्षाला बहुमत दिले आणि एनटीआर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. १५ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांचे राजकारणातील योगदान इतिहासाच्या नेहमीच स्मरणात राहील.
आंध्र प्रदेशमध्ये स्पेशल कंमाडो फोर्स स्थापन करण्यापासून ते २ रुपये किलो तांदुळ उपलब्ध करण्यापर्यंत आणि नक्सलवाद संपवण्यासाठी उचललेल्या पावलांची विशेष नोंद घेतली जाते. त्यांच्या कारकिर्दीत हैदराबादमधील जातीय दंगली शांत झाल्या.