मुंबई - एखादं ध्येय गाठायंचं असं जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर, ते साध्य करण्यासाठी ती जीवाचं रान करू शकते. असंच एक उदाहरण म्हणजे मयुरी कांगो. ९० च्या दशकात आपल्या निरागस अभिनयाने सर्वांच्या हृदयावर भूरळ पाडणारी एक युवा अभिनेत्री ते एक यशस्वी मॅनेजिंग डायरेक्टर असा प्रवास तिने साध्य केला. या प्रवासात तिला बऱ्याच कठिण प्रसंगांचाही सामना करावा लागला. मात्र, आपल्या जिद्दीच्या बळावर तिने हा प्रवास पूर्ण केला.
९० च्या दशकात तिने 'पापा कहते है' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. यातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. तिच्या निरागस चेहऱ्याने तिला ओळख निर्माण करून दिली. यानंतरही बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या. मात्र, तिला यश मिळाले नाही.
१७ वर्षापूर्वी तिने दाक्षिणात्य चित्रपट 'वामसी'मध्येही भूमिका साकारली. मात्र, यामध्येही तिला यश मिळाले नाही. अखेर तिने चित्रपटक्षेत्राला रामराम ठोकला.
'अशी' घेतली होती अभिनयात एन्ट्री -
सईद अख्तर मिर्झा यांनी मयुरीमध्ये एका अभिनेत्रीचा शोध घेतला होता. त्यांच्या 'नसीम' या चित्रपटामध्ये त्यांनी तिला संधी दिली. यामधील तिच्या भूमिकेची बरीच प्रशंसा झाली. खरंतर तिला महेश भट्ट यांनी लॉन्च केलं होतं. त्यांना एका नव्या चेहऱ्याचा शोध होता. मयुरीच्या रूपात त्यांचा हा शोध पूर्ण झाला होता. 'पापा कहते है' या चित्रपटात त्यांनी मयुरीला संधी दिली. तिचा अभिनय त्यांना इतका आवडला, की बस निळ्या डोळ्यांची हिच मुलगी आपल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार, असं त्यांनी ठरवलं होतं. पुढे चित्रपट हिट ठरला.
या चित्रपटाने मयुरीला आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवून दिले. पहिल्याच चित्रपटातून एका रात्रीत स्टार झालेल्या मयुरीची सर्व दिग्दर्शकांवर छाप पडली होती. मात्र, पुढे तिला जसे रोल पाहिजे तसे मिळाले नाही. तिने छोट्या मोठ्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. चांगले चित्रपट मिळतील, अशी तिला आशा होती. मात्र, पुढे अखेर तिला इंडस्ट्रीतून माघार घ्यावी लागली.
मयुरीने पुढे आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शिक्षणाचा उपयोग घेऊन तिने कॉर्पोरेट क्षेत्रात एन्ट्री घेतली. पुढे तिने २००३ साली एनआरआय असलेल्या आदित्य ढिल्लनसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.