हैदराबाद - ज्येष्ठ अभिनेते सीन कोनेरी यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बाँडचे पात्र सर्वप्रथम साकारण्याचा आणि ते अजरामर करण्याचा मान कोनेरी यांना जातो. एडिनबर्गमधील एका झोपडपट्टीमध्ये वाढलेल्या कोनेरी यांनी कॉफीन पॉलीशर, दुधवाला म्हणूनही काम केले होते. त्यांना शरीरसौष्ठवाची आवड होती त्यातूनच पुढे त्यांना अभिनय क्षेत्रात संधी मिळाली होती.
कोनेरी यांनी १९६२ ला सर्वप्रथम जेम्स बाँडची भूमिका साकारली होती. त्यांच्या संवाद फेकीमुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. लोक त्यांना याच भूमिकेमुळे ओळखू लागले. मात्र, स्वत: कोनेरी यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मला त्या जेम्स बाँडचा राग येतो, असे ते म्हणाले होते.