मुंबई - माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताचा आज ४१वा वाढदिवस आहे. लाराने २००० साली 'मिस युनिव्हर्स' हा किताब पटकावला होता. याचवर्षी प्रियांका चोप्रा देखील 'मिस वर्ल्ड' बनली होती.
'मिस युनिव्हर्स'च्या मुलाखत फेरीमध्ये लारा दत्ताने ९.९९ गुण मिळवून विक्रम तयार केला होता. या फेरीमध्ये लाराला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देऊन लाराने 'मिस युनिव्हर्स'च्या मुकुटावर आपले नाव कोरले.
त्यावेळी स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित केली होती, तिथे त्याविरोधात मोर्चा सुरु होता. सौंदर्य स्पर्धा हा महिलांचा अपमान आहे, असे त्या मोर्चातील लोक म्हणत होते. त्यांच्या या विधानाला तुम्ही कसे चुकीचे सिद्ध कराल, असा प्रश्न लाराला यावेळी विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना लारा म्हणाली होती की, 'मला असे वाटते की, 'मिस युनिव्हर्स'सारख्या स्पर्धा आमच्या सारख्या तरुण महिलांसाठी एक चांगले व्यासपीठ आहे. आपल्या मनाप्रमाणे क्षेत्र निवडण्याचा हक्क आम्हाला यामधून मिळतो. कोणता व्यवसाय असो, सैन्य असो किंवा राजकारण, हे व्यासपीठ आम्हाला आमची निवड आणि आमचं मत मांडण्याचा अधिकार देतो.' लाराच्या या उत्तराने परीक्षक अत्यंत प्रभावी झाले होते.
लारा दत्ताची आईदेखील १९६७ साली 'मिस इंडिया' स्पर्धेची पहिली रनरअप होती. लाराने २००३ साली अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
लारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चेत राहिली. तिचे दाक्षिणात्य अभिनेता केली दोरजीसोबतचे लव्ह अफेअर्सही बरेच गाजले होते. त्याच्यासोबत ती लिव्ह इन रिलेशनशीपमध्येही राहत होती. त्यानंतर तिचे नाव टायगर वुड्स आणि डीनो मोरियो यांच्यासोबतही जोडले गेले.
त्यानंतर २०११ साली तिने भारतीय टेनिसपटू महेश भूपती याच्यासोबत लग्नगाठ बांधली. महेशचा हा दुसरा विवाह होता.