मुंबई - सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील नेपोटिझ्मचा मुद्दा पुढे आला आहे. यात सुशांतच्या फॅनसह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही आपला आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात आता प्रसिद्ध गायक कुमार सानू सहभागी झाला आहे. बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म आहे या गोष्टीचा त्याने स्वीकार केला आहे. कुमार सानूने एक इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केलाय. यात त्याने या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले आहे. सुशांतच्या जाण्याने एका वेगळ्या प्रकारची क्रांती सानूला दिसत आहे. ''नेपोटिझ्म प्रत्येक ठिकाणी आहे. आमच्या बॉलिवूडमध्ये थोडा जास्त आहे, मात्र सर्वत्र आहे. हे तुम्ही आणि आम्ही जाणतो. कोण काम करणार, कोण फिल्म इंडस्ट्रीत काम करणार, हे सिनेमा बनवणारे ठरवू शकत नाहीत. हे तुमच्या हातात आहे. कोणाला ठेवायचे आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवू शकता,'' असे कुमार सानूने म्हटले आहे.
कुमारने म्हटलंय, ''जे मुंबईत स्ट्रगल करीत आहेत, त्यांना सल्ला देऊ इच्छितो. ते कलाकार असोत की गायक. मुंबईत येताच एक नोकरी मिळवा. असे मीदेखील केले आहे. यामुळे तुम्हाला राहण्या-खाण्याची चिंता राहणार नाही. तुम्ही सहज स्ट्रगल करू शकाल.''