कोलकाता- पश्चिम बंगाल सरकारने फिल्म आणि टेलिव्हिजनच्या चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर आज (गुरुवारी) कोलकात्यात अनेक मालिकांच्या शूटिंगचे काम सुरू झाले. मात्र य शूटिंगदरम्यान कलाकार आणि टेक्निशियन यांना योग्य ती खबरदारी घेत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कोलकात्यातील इंद्रपुरी स्टुडिओ, भारतलक्ष्मी स्टुडिओ आणि टालीगंज या स्टुडिओमध्ये विविध मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. यावेळी तांत्रिक बाबी हाताळणारे टेक्निशियन मास्क, ग्लोव्ह्ज, पीपीई किट आदी वापरून काम करताना दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रीकरणाला आलेल्या सर्व कलाकार आणि इतर सदस्यांना स्टुडिओ परिसरात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग करूनच आत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच कलाकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण सेट आणि मेकअप रूम व्यवस्थित सॅनिटाईज केल्या जाणार आहेत.
मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर गेल्या अनेक दिवसांपासून बंदी घालण्यात आली होती. बंगालचे सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री अरूप विश्वास आणि बंगाली फिल्म इंडस्ट्रीच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अखेर या समस्येवर तोडगा काढण्यात आला.
कलाकार संघटनेच्या प्रतिनिधींनी चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी काही अटी घातल्या होत्या. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक कलाकाराला २५ लाखांचे वीमा कवच पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. पहिल्या दिवशी चित्रीकरणाच्या प्रक्रियेत बरेच अडथळे आल्याचे दिसून आले. कारण कलाकारांना वीमा सुरक्षा देण्याच्या कारणावरून अनेक निर्माते आणि वाहिन्यांचे मालक यांच्यात ताळमेळ नसल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण खोळंबले होते.