महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोल्हापूरची 'व्हिलेज गर्ल' बनली 'दंगल गर्ल', आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शिवानी मेटकरची निवड

खडकेवाडा या कागल तालुक्यातील मेंढपाळाच्या मुलीने कुस्तीसारख्या क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावले आहे. शिवानी मेटकर, असे नाव असलेल्या १४ वर्षाच्या मुलीने अलिकडेच बालेवाडीत झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली. सामान्य धनगराच्या मुलीच्या या अचाट जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Kolhapur Dangal girl
'व्हिलेज गर्ल' बनली 'दंगल गर्ल'

By

Published : Dec 13, 2019, 6:29 AM IST


कोल्हापूर - दंगल चित्रपटाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगाट यांचा प्रवास पहिला. यामध्ये कुस्तीपटू महावीर फोगाट यांच्या मुलींना कुस्तीपटू बनविण्याच्या जिद्दीचा प्रवास सुद्धा सर्वांनी पाहिला. दंगल चित्रपटानंतर खरंतर अनेकांनी आपल्या मुलींना कुस्तीपटू करण्याचं स्वप्न पाहून कुस्तीच्या मैदानात उतरवले आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील खडकेवाडा या छोट्याशा गावातील धनगराच्या मुलीने सुद्धा गीता फोगाटसारखे कुस्तीपटू होण्याचे स्वप्न बाळगले. गेल्या अनेक दिवसांपासून ती बाणगे गावातील आखाड्यात कुस्तीचे धडे घेत आहे. नुकतीच तिची काठमांडू येथे पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोण आहे ही कुस्तीपटू आणि कशापद्धतीने ती या क्षेत्रात उतरली? यावरचा हा खास रिपोर्ट...

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शिवानी मेटकरची निवड

पिढ्यानं पिढ्या शिक्षणापासून दूर राहिलेल्या धनगर समाजातील एका छोट्याशा कुटुंबातील 14 वर्षांची मुलगी शिवानी बिरु मेटकर. आजही शिवानीच्या कुटुंबीयांचा मेंढी पालनाचाच मुख्य व्यवसाय आहे. शिवाणी गावाजवळच असणाऱ्या आणूरमधील संत ज्ञानेश्वर एज्युकेशन अ‌ॅकॅडमी या शाळेत 8 वी मध्ये शिकत आहे. लहानपणापासून तिचा दूरवर कुस्तीशी काहीही संबंध नव्हता. पण, दंगल चित्रपट पाहून कुस्तीपटू होण्याचं स्वप्न तिनं पाहिलं होतं आणि आता ते पूर्ण करण्यासाठी ती स्वतः मेहनत घेत आहे.

शिवानीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महावीर फोगाट यांच्या रूपाने तिचे काका म्हणजेच बाबू मेटकर यांनी विडा उचलला. शिवानीला पैलवान करण्यासाठी घरचे कोणीही तयार नव्हते. पण, कुटुंबीयांचा विरोध डावलून शिवानीला पैलवान करायचंच या जिद्दीने तिच्या काकांनी तिला आखाड्यात पाठवलं.

सुरुवातीला शिवानीच्या आई, वडिलांनी शिवाणीला कुस्ती क्षेत्रात पाठविण्यासाठी विरोध केला होता. पण काकांच्या हट्टानंतर घरचेही तयार झाले. शिवानीने पुण्यातील बालेवाडी येथे पार पडलेल्या रूरल गेम्स चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. त्यामुळे घरचे सुद्धा तिच्यावर खुश असून यापुढेही तिने अशीच कामगिरी करून गावाचं नाव मोठं करावं असंही घरच्यांनी म्हंटल आहे.

रूरल गेम्स चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेत शिवानीनं गोल्ड मेडल पटकवल्यानंतर आता तिची काठमांडू येथे पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे गावाजवळच्याच एका तालमीत वस्ताद शिवाजीराव जमनिक यांच्याकडून ती कुस्तीचे धडे घेत आहे. गेल्या वर्षभरापासून अतिशय चांगल्या प्रकारे तिचा सराव सुरू असून भविष्यात नक्कीच ती भारताचे नाव करेल, असा विश्वास वस्ताद शिवाजीराव जमनिक यांनी व्यक्त केलाय.

एका छोट्याशा गावातील धनगर समाजातील शिवानीनं कुस्तीपटू होण्याचं जे स्वप्न उराशी बाळगलं आहे, त्याचं आता अनेकांकडून कौतुक होत आहे. शिवाय भविष्यात नक्कीच देशाचे नाव उज्वल करेल, असा विश्वास सर्वजण व्यक्त करत आहे. शिवानीचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ईटीव्ही भारतच्या हार्दिक शुभेच्छा.

ABOUT THE AUTHOR

...view details