मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ९० च्या दशकात टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने तिने बरेचसे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. कपूर कुटुंबातील असुनही तिला बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण करण्यासाठी सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करावी लागली. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
करिश्मा कपूरने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिने अभिनयासाठी तिचे शिक्षणही अर्धवट सोडले होते. १९९१ साली तिचा पहिला चित्रपट 'प्रेम कैदी' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने दाक्षिणात्य अभिनेता हरीश कुमार याच्यासोबत भूमिका साकारली होती.
करिश्माने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते, तेव्हा तिच्या लूकवरुन तिला ट्रोल केले गेले होते. पुढे तिने तिचा मेकओव्हर करून सर्वांना अचंबित केलं. त्यानंतर तिने आमिर खानसोबत 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटात भूमिका साकारली. हा चित्रपट तेव्हा सुपरडुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान पटकावले. या चित्रपटाबाबत एक किस्सा सांगितला जातो. खरंतर हा चित्रपट सुरुवातीला ऐश्वर्या रायला ऑफर करण्यात आला होता. मात्र, तिने या चित्रपटाला नकार दिल्यानंतर करिश्माला हा चित्रपट देण्यात आला. या चित्रपटातील तिचा आणि आमिर खानचा किसींग सिन त्यावेळी फार चर्चेत राहिला. या चित्रपटातील भूमिकेसाठी करिश्माला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
पुढे तिचे आणि अभिषेक बच्चनचे अफेअरही फार गाजले. त्या दोघांनी साखरपुडादेखील केला होता. मात्र, अचानक दोघेही वेगळे झाले. त्यांच्या वेगळे होण्यामागचं कारण अजुनही समोर आले नाही.
सध्या करिश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या ११ वर्षानंतर २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तिला दोन मुलेही आहेत.