मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. लवकरच ती 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. १० जानेवारी हा 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त कंगनाने इंग्रजी भाषेशी 'पंगा' घेत हिंदी भाषेचं महत्व सांगितलं आहे.
कंगनाची बहिण रंगोली चंडेलने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कंगना हिंदी भाषेचं महत्त्व सांगताना दिसते. 'जर आपल्याला इंग्रजी भाषा येत नसेल, तर त्याची लाज वाटते. मात्र, हिंदी भाषेतही आपण अडखळलो, तर त्याबद्दल काहीच वाटत नाही. आपली भाषा कधी सामाजिक स्तरावर आपली प्रतिमा उंचावते किंवा हीच भाषा आपल्या प्रतिभेचे प्रमाणपत्रही असते. मात्र, चित्रपट क्षेत्रात नेहमीच माझ्या हिंदी भाषेची खिल्ली उडवली गेली. तरीही मी हिंदी भाषेला सर्वात उंच स्तरावर ठेवले. ज्यामुळे मला माझे धैय्य मिळाले'.