मुंबई - भारतीय क्रिकेट विश्वातील रोमांचकारी आणि एतिहासिक ठरलेला १९८३ सालचा क्रिकेट विश्वचषक सामना पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपाने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सामन्यावर आधारित '८३' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याच चित्रपटाचे तमिळ आणि तेलुगू व्हर्जनही तयार होणार आहे. यासाठी कमल हासन आणि नागार्जुन यांनी पुढाकार घेतला आहे.
होय, कमल हासन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या 'राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल' या कंपनीद्वारे या चित्रपटाची तमिळ भाषेत निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ८३ च्या सामन्यातील क्षण रिक्रियेट करण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळणार आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा -दाक्षिणात्य कलाकारांसह एकत्र झळकणार बिग बी आणि जया बच्चन, पाहा फोटो
या चित्रपटाच्या निमित्ताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने कशाप्रकारे अशक्य असलेला सामना फक्त विश्वासाच्या जोरावर जिंकला, हे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची कथा तमिळ भाषेतही पाहायला मिळावी, यासाठी या चित्रपटाचे तमिळ व्हर्जन तयार करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तेलुगू स्टार अक्किनेनी नागार्जुन यांनी देखील त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ८३ हा चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ''८३' हा चित्रपट १९८३ साली मिळवलेल्या यशावर आधारित आहे. ही अशी कथा आहे, ज्याला सांगण्याची गरज नाही. बहुप्रतिक्षित असलेल्या या चित्रपटाला तेलुगू भाषेत तयार करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे', असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -नव्या वर्षात राजकुमार राव घेणार 'छलांग', पहिले पोस्टर प्रदर्शित
'८३' चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. त्यांनी देखील कमल हासन आणि नागार्जुन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेत. १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.