दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी ‘काळी माती’ या चित्रपटात ज्ञानेश्वर बोडके या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा सादर केली आहे. शेतकरी आणि बैलांचं नातं अतूट असतं. सुमधूर गीत-संगीतानं सजलेल्या सिनेमांतील कथा पहायला प्रेक्षकांना खूप आवडतात. हाच धागा पकडून हेमंतकुमार यांनी या चित्रपटात बैल पोळ्याचं गाणं सादर करण्यात आलं आहे. ३९९ पुरस्कार पटकावत विश्वविक्रम करणाऱ्या 'काळी माती' या आगामी मराठी चित्रपटात एका शेतकऱ्याची कथा पहायला मिळणार आहे.
गीतकार कल्याण उगळे यांनी 'सण आला बैल पोळ्याचा...' असे गाण्याचे बोल असलेले ‘बैल पोळा’ गीत लिहिलं असून, अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीनं त्यावर स्वरसाज चढवला आहे. डॅा. गौरी कवी आणि प्रियांका मित्रा यांनी हे गाणं गायलं आहे. पुण्याजवळ असलेल्या खेडमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं आहे. चित्रांकनात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, लावणी आणि लेझीम यांची सांगड घालण्यात आली आहे. यासाठी मोठी रांगोळी काढण्यात आली होती आणि संपूर्ण परिसर पताकांनी सजवण्यात आला होता. कोरिओग्राफर लॉलीपॉप यांनी या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची पटकथा मयूर आडकरनं लिहीली असून, संवाद अनिल राऊत आणि हेमंतकुमार महाले यांचे आहेत. डीओपी सुरेश सुवर्णा आणि राजा फडतरे यांनी आपल्या जाणकार नजरेतून या चित्रपटाचं छायालेखन केलं आहे. संकलन सुभीराज यांनी केलं आहे.
'काळी माती' या चित्रपटातील बैल पोळ्याच्या गाण्याच्या प्रसंगासोबतच एकूणच या गाण्याबाबत हेमंतकुमार म्हणाले की, या चित्रपटात बैल पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं सर्व गावकरी एकत्र येतात आणि बैलांची पूजा केली जाते. बैलांना खाऊ-पिऊ घातलं जातं. त्यानंतर छान पारंपरीक नृत्य केलं जातं. लावणी नृत्यासारखाच हा प्रकार समूहनृत्याद्वारे सादर केला जातो. या गाण्यात बरेच गावकरी व बैलही आहेत. अशा पद्धतीचं बैल पोळा या सणावरील गाणं आजवर कोणत्याही चित्रपटात आलेलं नाही.