मुंबई - बॉलिवूडमध्ये सूफी गाण्यांचे सरताज म्हणून ओळखले जाणारे कैलाश खेर यांचा आज वाढदिवस आहे. ७ जुलै १९७३ साली त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे झाला होता. कैलाश यांना गायनाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. त्यांचे वडील हे काश्मिरी पंडित होते. त्यांना लोकगीताची प्रचंड आवड होती. त्यामुळे कैलाश खेर यांना बालपणापासूनच संगीतात आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून कैलाश यांनी गायनामध्ये एन्ट्री घेतली. आज ते बॉलिवूडचे यशस्वी गायक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
कैलाश यांचा गायनाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांनी जेव्हा गायनातच करिअर करण्याचे ठरवले होते, तेव्हा त्यांच्या घरातून त्यांना विरोध झाला होता. मात्र, तरीही ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी गायनासाठी घर सोडले होते.
सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी संगीताचे धडे घेतले. कधीकधी त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर दिवस काढले. त्यानंतर त्यांनी मुलांना संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली. यातून ते स्वत:चा उदरनिर्वाह करत असत. या दरम्यान ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांना कोणतीही आशेची किरण दिसत नव्हती. पुढे १९९९ मध्ये त्यांनी हँडीक्राफ्ट बिझनेस सुरु केला होता. मात्र, यामध्येही त्यांना प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे ते आणखीनच निराशेच्या गर्तेत अडकले गेले. असे म्हटले जाते, की यावेळी त्यांनी आत्महत्येचाही विचार केला होता.