मुंबई - मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार झाले आहेत. आजकाल बायोपिकचाही सुकाळ सिनेसृष्टीत पाहायला मिळतोय. एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्याकडेही दिग्दर्शकांचा कल वाढलेला दिसतोय. आता ज्येष्ठ लेखिका आणि माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या सत्य घटनेवर आधारित कादंबरीवर चित्रपट तयार करण्यात येत आहे. जजमेंट असे या चित्रपटाचे नाव आहे. ११ फेब्रुवारीला मुंबईत या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आहे.
'जजमेंट' या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सुर्वे हे करत आहेत. यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. घरगुती हिंसाचार या विषयावर आधारित हा चित्रपट आधारित आहे. तेजश्री या चित्रपटात एका महिला वकिलाची भूमिका साकारतेय, तर मंगेश हा तिच्या विक्षिप्त वडीलांच्या भूमिकेत आहे.