पूर्वी देमार चित्रपटांतील मारामारीच्या दृश्यांना शिट्ट्या आणि टाळ्या मिळत असत. कालांतराने चित्रपटांचा गाभा बदलत गेला आणि त्यातील कथानकं वास्ताविकतेकडे झुकू लागली. परंतु आजही हिरो व्हिलनला मारताना टाळ्या वाजविणारा प्रेक्षकवर्ग आहे. भलेही मल्टिप्लेक्स प्रेक्षक त्यात समाविष्ट नसेल परंतु शहरी भागांबाहेर असलेला एकल सिनेमागृहांतील प्रेक्षक आजही फक्त आणि फक्त मनोरंजित होण्यासाठी थिएटरची वाट धरतो. विचार करायला लावणारे कथानक त्याला नको असते कारण त्याला त्याचा मानसिक शीण घालविणे अधिक गरजेचे वाटत असते. आणि हो, हा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे म्हणूनच समीक्षकांनी नाकारलेला चित्रपट तुफान चालतो. पडद्यावरील मारामारी, ऍक्शन, रोमान्स इ. गोष्टीत तो रमतो. आणि याच प्रेक्षकवर्गाला आवडेल असा सत्यमेव जयते २ आहे. पूर्वीच्या मसाला देमार चित्रपटांची आठवण करून देणारा हा चित्रपट असून जॉन अब्राहामच्या चाहत्यांना पर्वणी आहे कारण एक नव्हे, दोन नव्हे तर तीन तीन जॉन पडद्यावर अवतारताना दिसतात. दिग्दर्शक मिलाप झवेरी मनमोहन देसाई सदृश दिग्दर्शकांचा चाहता आहे आणि त्याने डोके बाजूला ठेऊन करण्यात येणारे मनोरंजन पेश केले आहे. त्याने भ्रष्टाचार संपविण्यासाठी ‘खाकी’ आणि ‘खादी’ एकत्र आणले असून अशा चित्रपटांत नेहमी दोन भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकताना दिसतात, त्याच्या विरुद्ध दृश्य या चित्रपटात दिसते. हा चित्रपट पाहताना ‘शेहनशाह’, ‘अमर अकबर अँथनी’ सारख्या चित्रपटांची आवर्जून आठवण येईल.
‘सत्यमेव जयते २’ मध्ये सत्य (जॉन अब्राहाम) आणि जय (जॉन अब्राहाम) नावाची जुळी भावंडं आहेत ज्यांचे वडील, दादासाब आझाद (जॉन अब्राहाम) भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना मरण पावले असतात. २५ वर्षे त्यांची आई (गौतमी गाडगीळ कपूर) कोमात असते. सत्य आझाद राज्याचा गृहमंत्री असतो तर जय पोलीस खात्यात एसीपी. सत्यची बायको विद्या (दिव्या खोसला कुमार) ही राजकारणात त्याला विरोध करीत असली तरी खाजगी आयुष्यात त्याच्या पाठीशी उभी असते. चित्रपटात हॉस्पिटल्स मधील भ्रष्टाचार, मध्यान्न भोजनातील भ्रष्टाचार, सरकारी नोकरांचा भ्रष्टाचार, राजकीय भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टींना हात लावत गोष्ट पुढे सरकत राहते. सत्य विधानसभेत भ्रष्टाचारविरोधी विधेयक सादर करतो परंतु विरोधक आणि त्याच्याच पक्षातील काही लोक ते पास होऊ देत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी, धडा शिकविण्यासाठी तो वेगळा मार्ग अवलंबितो. तो कुठला ते चित्रपटातून कळेल. दरम्यान शहरात भ्रष्टाचारी लोकांचे मृत्यू होऊ लागतात आणि खुन्याचा छडा लावण्यासाठी एसीपी जय आझादला पाचारण केले जाते. अनेक मारधाडींनंतर खुन्याचा शोध लागतो तसेच त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचे कारणही कळते जेव्हा त्यांची आई कोमातून बाहेर पडते.