मुंबई -बॉलिवूडची 'धडक गर्ल' जान्हवी कपूर आपल्या पहिल्याच चित्रपटातून लोकप्रिय झाली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं बरंच कौतुक करण्यात आलं. श्रीदेवी तिच्या पदार्पणासाठी खूप आतूर होत्या. बऱ्याचदा त्या सेटवर जाऊन जान्हवीला काही टीप्स देत असत. मात्र, आपल्या लेकीची भूमिका पाहण्याआधीच श्रीदेवी यांचं निधन झालं. अलिकडेच जान्हवीने मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने श्रीदेवी यांनी तिला दिलेल्या काही टीप्सचा उलगडा केला.
श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन जान्हवीनेही अभिनयाची वाट निवडली. 'धडक' चित्रपटातून तिला पहिला ब्रेकही मिळाला. अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी श्रीदेवी यांनी तिला काही टीप्स दिल्या होत्या. तिने या फेस्टिव्हलमध्ये सांगितलं की श्रीदेवी तिला नेहमी सांगायच्या, की 'तुम्ही जो विचार करता तो तुमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. त्यामुळे एक चांगला कलाकार बनण्यासाठी व्यक्तीदेखील चांगली असायला पाहिजे. कारण, कॅमेऱ्यात सर्वकाही नजरेत येत असतं. त्यापासून काही लपवता येत नाही'.