लॉस एंजेलिस :प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन याने आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. बहुप्रतिक्षित अवतार-२ आणि अवतार-३ या सिनेमांचे शूटींग पूर्ण झाल्याचे त्याने सांगितले आहे.
२००९साली प्रदर्शित झालेल्या, आणि दशकातील सर्वात मोठा चित्रपट मानल्या जाणाऱ्या अवतार या चित्रपटानंतर त्याच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा चाहत्यांना लागून होती. आता तब्बल ११ वर्षांनंतर या चित्रपटाच्या पुढील दोन भागांचे शूटींग पूर्ण झाल्याची बातमी समोर आली आहे. अर्नाल्ड श्वार्झेनेगर या अभिनेत्याला दिलेल्या मुलाखतीत कॅमेरुनने याबाबत माहिती दिली.
यावर्षी अवतारचे न्यूझीलंडमध्ये शूटींग सुरू होते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे शूटींग लांबले होते. जूनमध्ये न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर खबरदारीच्या उपायांसह शूटींग सुरू करण्यात आले होते.