कोरोना काळात कोरोना योद्ध्यांमध्ये पोलिसांचे नाव खूप वर असेल. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडली आणि अजूनही त्यासाठी ते झटताहेत. या कठीण वेळी अनेक सेलिब्रिटीज वेगवेगळ्या पद्धतीची मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. श्रीलंकेची ब्युटी क्वीन आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज भारतामध्ये राहते आणि तिनेदेखील भरपूर सामाजिक कार्य केले आहे. भारत देशाला व्हायरस विरूद्ध लढायला मदत करण्यासाठी ही विदेशी अभिनेत्री कसलीही कसर सोडत नाहीये.
जॅकलिन ‘योलो’ या संस्थेद्वारे अनेक सामाजिक उपक्रमांत हिरीरीने भाग घेते. अलीकडेच तिने पुणे पोलिस फाउंडेशनला हातभार लावून पुणे पोलिसांना मदत केली. तसेच नुकतेच तिने अन्नदानासाठी मोठी मदत केली आणि स्वतः बाहेर येऊन तिने अन्नवाटप केले. आता जॅकलिनने मुंबई पोलिसांसाठी रेनकोट दिले असून त्यांचा येणाऱ्या आणि अवकाळी बरसणाऱ्या पावसाळ्यात उपयोग होईलच परंतु त्यांचा पीपीई किट सारखा देखील कोरोना विरुद्धची ढाल म्हणून उपयोग होईल. रेनकोट्ससोबत तिने इतर सुरक्षारक्षक वस्तूसुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी याची दाखल घेत सोशल मीडियावरून जाहीरपणे जॅकलिनचे आभार मानले आहेत. ‘जून जवळ येत असतानाच अख्खी मुंबई पावसाळ्याची तयारी करीत आहे. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा तशाच तयारीला लागलो आहोत. थँक यू @Asli_jacqueline and #YoloFoundation या मदतीमुळे आमचे कर्मचारी या पावसाळ्यात आणि साथीच्या रोगात सुरक्षित राहण्यास मदत होईल. #StongerTogether