महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शिवाजी महाराजांची भूमिका कितीही वेळा साकारायला मिळाली तरी ती पर्वणीच - चिन्मय मांडलेकर - Chinmay Mandalekar latest news

अभिनेता चिन्मय मांडलेकर हा 'फत्तेशिकस्त' या सिनेमात पुन्हा एकदा महाराजांच्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत असल्याने त्यांची भूमिका कितीही वेळा साकारायची संधी मिळाली तरीही ती आपल्यासाठी पर्वणीच असेल असं मत चिन्मयने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.

चिन्मय मांडलेकर

By

Published : Nov 2, 2019, 7:05 PM IST

'फर्जंद' या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकरल्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर हा 'फत्तेशिकस्त' या सिनेमात पुन्हा एकदा महाराजांच्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत असल्याने त्यांची भूमिका कितीही वेळा साकारायची संधी मिळाली तरीही ती आपल्यासाठी पर्वणीच असेल असं मत चिन्मयने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.

'फर्जंद' हा सिनेमा बनवण्याच्या वेळीच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्या डोक्यात शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या 5 ऐतिहासिक प्रसंगावर पाच सिनेमे बनवण्याचं घोळत होतं. त्यामुळे तो सिनेमा रिलीज झाल्यानंतरच या सिनेमच्या तयारीला आम्ही लागलो होतो. 'फर्जंद'मधील शिवाजी महाराज हे मोहीम आखणारे होते. मात्र 'फत्तेशिकस्त' सिनेमात महाराज स्वतः मोहिमेचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. त्यामुळेच या सिनेमासाठी जास्त मेहनत घ्यावी लागल्याचं चिन्मयने मान्य केलं. घोडेस्वारी, तलवारबाजी, व्यायाम आशा सगळ्याच बाजूनी या सिनेमासाठी तयारी केल्याचं त्याने सांगितलं.

चिन्मय मांडलेकर

शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालातून पळून जाणाऱ्या शाहिस्तेखानाची तीन बोटं छाटली... ही गोष्ट ही प्रत्येक मराठी माणसाला माहीत आहे. मात्र तरीही ही मोहीम नक्की कशी आखली गेली, त्यातले धोके नक्की कोणते होते, त्यामागे नक्की किती तयारी करण्यात आली होती. हे तपशील आपल्यातील अनेकांना नीट माहीत नाहीत. त्यामुळे जरी सिनेमाचा शेवट प्रेक्षकांना ठाऊक असला तरीही हा सिनेमा प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवेल याची खात्री असल्याचं त्याने सांगितलं.

'फत्तेशिकस्त' सिनेमातील बहुतांश टीम ही 'फर्जंद'मधीलंच असली तरीही काही मंडळी नव्याने या टीममध्ये दाखल झाली आहेत. गेल्यावेळी फर्जंदची भूमिका साकारणारा अभिनेता अंकित मोहन यावेळी येसाजी कंक याच्या भूमिकेत असला तरीही या टीमचा एक भाग म्हणून त्याने सोबत काम केलं. याशिवाय शिवभक्तीने प्रेरित होऊन काम केल्याने टीमला एकत्र आणण्यासाठी आम्ही राजगड आणि रायगड या स्वराज्याच्या दोन्ही तिर्थक्षेत्रावर जाऊन आल्याच त्याने सांगितलं.

देशाच्या मातीत परकीय शत्रूवर झालेला हा पहिला 'सर्जिकल स्ट्राईक' आजच्या पिढीला निश्चितच पाहण्यासारखा आहे. कमी माणसं, कमी साधनं आणि टेक्नॉलॉजीची कोणतीही मदत नसताना केलेला हा पराक्रम पडद्यावर पाहणे ही निश्चितच एक आनंददायक बाब आहे. त्यामुळे टीव्हीवर किंवा मोबाईलवर पाहण्याजोगा हा सिनेमा नाही. सहकुटुंब सहपरिवार जाऊन 'हर हर महादेव'च्या घोषणा देत हा सिनेमा पाहायला हवा, असे मत चिन्मयने व्यक्त केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details