मुंबई -प्रायोगिक रंगभूमीला मुंबईत स्वत:चं असं हक्काचं नाट्यगृह मिळावं, अशी रंगकर्मीची अनेक वर्षापासूनच मागणी होती. आता ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रवींद्र नाट्य मंदिरातील पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर भव्य अशा प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह आकाराला येणार आहे. या कामाचा शुभारंभ राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रायोगिक रंगभूमी ही सर्व प्रकारच्या रंगभूमीचा पाया असल्याने तिच्या संवर्धनासाठी या रंगमचाची उभारणी करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत हे नाट्यगृह पूर्णपणे तयार करून जानेवारी २०१० पर्यंत त्यात नाटकाचे प्रयोग सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. १० वर्षांपासून लालफितशाहीत अडकलेल्या या नाट्यगृहाच काम अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर सुरू झाले आहे.
प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह आकाराला येणार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते शुभारंभ २३ ऑगस्टला पार पडलेल्या या शुभरंभाच्या कार्यक्रमाला आविष्कार नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा अरुण काकडे, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी हे देखील उपस्थित होते.
३९१ आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहातील खुर्च्या या फोल्डिंग स्वरूपातील असणार आहेत. त्यामुळे नाटकाच्या गरजेनुसार आसन व्यवस्थेत बदल करणे शक्य होईल. याशिवाय प्रोजेक्टरसह स्क्रीन, डिजिटल सिनेमा प्रोजेक्शनसाठी स्वतंत्र कक्ष, अद्ययावत अशी ध्वनीयंत्रणा आणि प्रकाशयोजना, सेन्टरलाईज वातानुकूलन, भव्य स्टेज, ड्रेपरी, मेकअप रूम, पिण्याच्या पाण्याची सोय आणि प्रसाधनगृह, याशिवाय नाटकाचं समान वर चढविण्यासाठी स्वतंत्र उदवाहनाची सोय असेल.
अनेकदा नाट्यगृह बांधून पूर्ण झाल्यावर कलाकार तंत्रज्ञ त्यातील त्रुटी सांगतात. यावेळी अशी कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी ५ नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ या कामावर देखरेख ठेवणार आहेत. वर्षाला हे नाट्यगृह २०० प्रयोगांसाठी कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्याचा शासनाने ठरवलं असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं. तर इतर वेळी बाकीच्या कार्यक्रमासाठी त्याचा वापर करण्याची मुभा राहील.
थोडक्यात काय तर दिवंगत नाटककार विजय तेंडुलकर आणि दामू केंकरे यांनी भर पावसात मोर्चा काढून प्रायोगिक रंगभूमीला हक्काचं नाट्यगृह मिळवून देण्यासाठी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद वाटतो या अरुण काकडे यांची प्रतिक्रिया याबाबत पुरेशी बोलकी ठरली आहे.