मुंबई - बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि त्याची बहिण सुनैना रोशन यांच्यातील नात्यात दुरावा तयार झाला असल्याची बातमी अलिकडेच समोर आली आहे. कंगना रनौतची बहीण रंगोली चंडैल हिने सुनैनासंबधी काही ट्विट केल्याने अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. तिच्या संबंधी येत असलेल्या बातम्या रोशन परिवारासाठी चिंतेची बाब ठरत आहे. मात्र, या कठिण परिस्थितीत हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान ही रोशन कुटुंबीयांच्या खंबिरपणे पाठिशी उभी राहिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने हृतिकची पाठराखण केली आहे.
सुझानने या पोस्टमध्ये लिहिलेय, की 'मी या कुटुंबासोबत खूप वेळ घालवला आहे. मला सुनैना चांगल्याप्रकारे माहिती आहे. तिचे वडील नुकतेच आजारपणातून बरे झाले आहेत. कृपया त्यांच्या या कठिण परिस्थितीत त्यांना आधार द्या, कोणतेही नकारात्मक विचार पसरवू नका', असे सुझानने लिहिले आहे.
अलिकडेच सुनैना रुग्णालयात भरती असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यानंतर सुनैनाच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन ट्विट व्हायरल झाल्यामुळे तिचे आणि रोशन कुटुंबीयांचे वाद सुरु असल्याचे या ट्विटवरून समजत आहे. खरेतर, हे तिचे अधिकृत अकाऊंट नाही. त्यामुळे यामध्ये किती सत्यता आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, कंगनाची बहीण रंगोलीने केलेल्या ट्विटनंतर, या घटनेला नवे वळण मिळाले आहे.