मुंबई - हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट गांधी जयंतीच्या दिवशीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडत या चित्रपटाने अवघ्या चारच दिवसात शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. आठवडाभरात या चित्रपटाच्या कमाईत वाढच होत गेली आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने १५० कोटीच्या घरात एन्ट्री केली आहे.
चित्रपटाच्या कमाईची भर पाहता हा चित्रपट लवकरच २०० कोटी क्लबमध्येही एन्ट्री करेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. टायगर आणि हृतिक दोघांच्याही करिअरमधला हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा -'दबंग ३'चं शूटिंग पूर्ण; सलमानने व्हिडिओ शेअर करत विनोद खन्नांना वाहिली आदरांजली
२०१९ चा हा कमी दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विकेंडशिवाय सणांचाही फायदा या चित्रपटाला झाला आहे. सुट्ट्यांमुळे प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
थरारक अॅक्शन्स, टायगर - हृतिकची जोडी असल्यामुळे हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपट समीक्षकांनीही या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेलुगू आणि तमिळ भाषेतही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.