महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राजमाता जिजाबाईंची जीवनगाथा मांडणारा 'जिऊ' - Historical Marathi film film on Jiu

राजमाता जिजाऊंच्या जीवनावर आधारित जिऊ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुजा देशपांडे यांचा 'जिऊ' हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

Historical film Jiu
जिऊ

By

Published : Jan 22, 2020, 12:47 PM IST

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता 'जिजाबाई'... इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता 'जिजाऊ' या शब्दांत सामावलेला आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या.

प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या कर्तुत्वाला हजारो-लाखो तोफांची सलामी दिली तरी कमीच आहे. शिवरायांच्या संगोपनात तसूभरही कसर न सोडणाऱ्या 'जिजाऊ' कशा होत्या या बद्दलची माहिती तशी कमीच पण त्यांचं कार्य जगासमोर आलं पाहिजे, खरंतर ती काळाची गरजच आहे म्हणा ना. स्त्री अबला नसून सबला आहे हे दाखवून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट नसता आला तरच नवल. नेमकी हीच बाब हेरत फायरफ्लाईज एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत अनुजा देशपांडे निर्मित आणि प्रितम एस.के. पाटील लिखित-दिगदर्शित 'जिऊ' हा मराठी चित्रपट लवकरच डोळ्यांचे पारणे फेडण्यास सज्ज होणार आहे.

जिऊ

अनुजा देशपांडे यांचा 'जिऊ' हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत 'जिऊ'ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललं आहे. तर 'खिचिक', 'डॉक्टर डॉक्टर' या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर तिसरा 'जिऊ' या आपल्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रितम एस.के.पाटील उत्सुक आहेत.

अनुजा देशपांडे सांगतात, "महिलांच्या हाती केवळ पाळण्याचीच नाही तर संपूर्ण राज्याच्या जडणघडणीची दोर देखील सक्षमपणे सांभाळण्याची ताकद आहे. स्वराज्य पर्वाची चाहूल देणारी ही आई आपल्या लेकींना सांगू पाहतेय उठा.. सज्ज व्हा.. स्वावलंबी व्हा...प्रगतीची नवी दालनं शोधा." लवकरच 'जिऊ' हा चित्रपट आपल्या भेटीस येईल. तत्पूर्वी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. स्वराज्य पर्वाची चाहूल देणाऱ्या फडकणाऱ्या भगव्याने सारा आसमंत सोनेरी प्रकाशात उजळणारे 'जिऊ'चं हे पोस्टर ही एका भव्य-दिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची नांदीच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details