मुंबई - संगीतक्षेत्रात आपल्या स्वरांनी चाहत्यांवर छाप उमटवण्यासाठी विविध सिंगिग रिअॅलिटी शोमधून कलाकार समोर येत असतात. अशाच गायकांना समोर आणण्यासाठी 'सोनी वाहिनी'वरील 'इंडियन आयडल' हा रिअॅलिटी शो सुप्रसिद्ध आहे. यंदा या शोचे ११ वे पर्व होते. या पर्वात अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परिक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकत अखेर पाच स्पर्धकांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये परिक्षकांनाही आपले अश्रु अनावर झालेले पाहायला मिळते.
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया, विशाल दादलानी आणि गायिका नेहा कक्कर यांनी 'इंडियन आयडल'च्या ११ व्या पर्वाच्या परिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्यासाठी फिनालेमध्ये पोहचलेले पाच स्पर्धक सनी हिंदुस्तानी, रोहित राऊत, अद्रिज घोष, अंकोना मुखर्जी आणि रिधम कल्याण यांनी गाणी सादर केली. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून हिमेश रेशमियासोबतच नेहा आणि विशाल दादलानी यांना सेटवरच रडू कोसळले.