मुंबई - छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंग राजपूत. 'शुद्ध देसी रोमान्स', 'काई पो चे', 'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ' आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटात त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या यशाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहायला मिळतो. मात्र, एवढ्यावरच न थांबता सुशांतला त्याची ५० स्वप्न पूर्ण करायची आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याच्या ५० स्वप्नांची यादी शेअर केली आहे.
त्याच्या या स्वप्नांच्या यादीत बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. अगदी, विमान उडवणं शिकण्यापासून ते कैलास पर्वतात ध्यानधारणा करण्यापर्यंत सर्व स्वप्नाची त्याने यादीच तयार केली आहे. त्याला लोंबरगीनी येथे स्वत:चं असा आलिशान बंगला बांधायचा आहे. तसंच पर्यावरण संवर्धनासाठी १००० झाडं लावण्याचाही त्याचा मानस आहे.
हेही वाचा-केआरकेच्या गाण्यावर बच्चन फिदा, बिग बीने शेअर केली गाण्याची लिंक
त्याला डाव्या हातानं क्रिकेट खेळायचं आहे. इंजिनियरींग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक दिवस राहायचं आहे. नासामध्ये वर्कशॉप करायचं आहे. ६ पॅक्स अॅब्स बनवायचे आहेत. टेनिस चॅम्पियन्ससोबत टेनिस खेळायचं आहे. जंगलात जाऊन आठवडाभर धमाल करायची आहे. घोडेस्वारी करायची आहे. नृत्याचे १० प्रकार शिकायचे आहेच. तर, मोफत शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करायचे आहेत. अश्या बऱ्याच स्वप्नांची यादी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.