परेश रावल यांनी १९८५ साली 'अर्जुन' चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून पदार्पण केले. १९८६ मध्ये आलेल्या नाम चित्रपटामुळे त्यांना लौकिक मिळाला आणि अभिनेता म्हणून नावही मिळाले. ८० ते ९० च्या दशकात परेश रावल यांची १०० हून अधिक चित्रपटातून भूमिका साकारल्या. एक क्रूर खलनायक साकारताना त्यांची एक प्रकारे दहशत निर्माण झाली होती. रुप की राणी चोरों का राजा, किंग अंकल, राम लखन, दौड, बाजी अशा असंख्य सिनेमातून रावल यांनी खलनायक साकारला. अंदाज अपना अपना या कल्ट कॉमेडीमध्ये त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.
'हेरा फेरी'तील बाबुराव गणपतराव आपटेची कमाल
२००० मध्ये आलेल्या हेरा फेरी चित्रपटाने रावल यांनी प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकली. राजू (अक्षय कुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) हे दोन भाडेकरु आणि घरमालक बाबूराव आपटे (परेश रावल) यांची पडद्यावरची केमेस्ट्री कमालीची होती. त्यांनी अंधुक दिसणारा, बढाईखोर आणि दयाळू मराठी जमीनदार बाबुराव गणपतराव आपटे ज्या पध्दतीने साकारला त्याला तोड नव्हती. या चित्रपटासाठी त्यांना अभिनयासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार मिळाला. त्यानंतर २००६ मध्ये आलेल्या हेरा फेरीच्या सीक्वेललाही तितकीच लोकप्रियता मिळाली.
परेश रावल हे हिंदी सिनेसृष्टीत जितके लोकप्रिय आहेत तितकेच दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही आहेत. आजवर त्यांनी दक्षिणेत काम केलेल्या चित्रपटांच्या यादीवर लक्ष टाकले तर ती यादी खूप मोठी आहे.