दक्षिणचा अॅक्शन स्टार ज्युनियर एनटीआर आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचा जन्म २० मे १९८३ रोजी हैदराबाद येथे झाला होता. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अभिनेते एनटी रामाराव यांचा तो नातू आहे. आजोबांप्रमाणे जूनियर एनटीआरलाही चित्रपट जगतात स्वत: साठी खास स्थान मिळवण्यात यश आले आहे. विशेषत: अॅक्शन, नृत्य आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्युनियर एनटीआरचा बोलबाला आहे.
महान एनटीआर यांचा वारसा
ज्यूनियर एनटीआरने लहानपणापासूनच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. स्वत: आजोबा चित्रपटांमधील अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असल्याने त्याला करिअर बनविण्यात कोणतीही अडचण नव्हती. आजोबा दिग्दर्शित ब्रह्मर्षी विश्वामित्र या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने बाल कलाकार म्हणून भूमिका केली होती.
आजोबांसारखाच दिसतो ज्यूनियर एनटीआर
ज्यूनियर एनटीआरचे पूर्ण नाव नन्दमुर्ती तारक रामा राव असे आहे. त्याचे दिसणे बहुतांशी आजोबा म्हणजेच एनटीआर यांच्या सारखे आहे. त्यामुळे सिने पदार्पणातच त्याने स्वतःची ओळख ज्यूनियर एनटीआर करुन घेतली. आज या घडीला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. आज त्याच्याकडे अनेक चित्रपट हातात आहेत.
टीव्ही शोमध्ये ज्यूनियर एटीआरचा जलवा
ज्यूनियर एनटीआरची लोकप्रियता लक्षात घेऊन बिग बॉस तेलुगु शोचे सूत्रसंचालन त्याच्याकडे देण्यात आले. या शोच्या हिट होण्यामागे त्याची लोकप्रियताही काही प्रमाणात कारणीभूत आहे.