छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. मराठा इतिहासातील महानायकच! आणि भारतातील गुप्तहेर संस्थेचे जनकच! बेमालूम वेशांतर करण्याचं कसब, भाषाचातुर्य, युद्धनीती, कुटनीती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असलेल्या बहिर्जींच्या अफाट कामगिरीच्या मदतीने स्वराज्याच्या असंख्य मोहिमा सफल झाल्या. याच बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका अभिनेता हरिश दुधाडे आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात साकारणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र झळकणार आहे.
आजवर विविधांगी भूमिका साकारत हरिश दुधाडेने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रंगभूमी आणि छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावर हरिश वेगवेगळ्या रुपात दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. हरीश यांच्या बहुरूपी भूमिका हे चित्रपटाचे खास वैशिष्टय़ ठरणार असून चित्रपटात अघोरी, कव्वाल,पोतराज यासारख्या नऊ विविध भूमिका हरीश यांनी आपल्या खास शैलीत साकारून चित्रपटाची रंगत वाढवली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना हरीश सांगतो की, बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. मला ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे.