मुंबई -दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्या 'गली बॉय' चित्रपटातून अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने 'एमसी शेर'ची तडफदार भूमिका साकारली होती. रणवीरसोबतच त्याच्या भूमिकेचेही फार कौतुक झाले. नवोदीत असुनही त्याने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांवर छाप पडली. त्यामुळे 'गली बॉय'नंतर तो पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
सिद्धांतने अलिकडेच त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल माहिती दिली आहे. एका माध्यमाशी बोलताना त्याने सांगितले, की 'माझ्या हातात सध्या दोन प्रोजेक्ट्स आहेत. त्यापैकी एक अॅक्शन चित्रपट राहणार आहे. त्यासाठी मी प्रशिक्षणही घेत आहे. तर, दुसरा चित्रपट हा विनोदी भूमिकेचा असेल'.