मुंबई - 'प्लॅनेट मराठी' (Planet Marathi) चा जगभरात असलेल्या सर्व मराठी प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार आशय असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम पोहोचवण्याचा मानस आहे. याच कामगिरीमुळे प्लॅनेट मराठीला ‘अचिवर्स अवॅार्ड’ मध्ये ‘प्रॅामिसिंग रिजनल ओटीटी अवॅार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
दुबईमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने 'एक्स्पो २०२० दुबई युएई' हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मराठीतील पहिलेवहिले ओटीटी प्लॅटफॉर्म ठरलेल्या 'प्लॅनेट मराठी'ने (Planet Marathi) आपला झेंडा अटकेपार रोवला आहे. या सोहळ्यात इंडियन पव्हेलियनमध्ये 'प्लॅनेट मराठी'च्या 'सहेला रे' (Sahela Re) या वेबफिल्मचा टीझर लॉन्च करण्यात आला तर ‘गोष्ट एका पैठणीची' (Goshta eka Paithnichi) या चित्रपटाचा प्रिमिअरही करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागमंत्री अमित देशमुख आणि सचिव आय.ए.एस सौरभ विजय तसेच महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट-नाटक व सांस्कृतिक विकास विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आय.ए.एस श्री. कैलाश पगारे आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आय.ए.एस कुमार खैरे उपस्थित होते. अमित देशमुख यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील कन्टेन्टची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मनोरंजन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.
अक्षय बर्दापूरकर यांची प्रतिक्रीया
''समृद्ध आणि वैभवशाली मराठी भाषेला सातासमुद्रापार पोहोचवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचा तसेच वेबसिरीजचा आशय, मांडणी खूप वेगळी असते. येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. 'एक्स्पो २०२० दुबई युएई' सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात 'प्लॅनेट मराठी'ची निर्मिती असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचा प्रिमिअर आणि 'सहेला रे' या वेबफिल्मचे टीझर लॉन्च होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.''
हेही वाचा -अनिल कपूर घेतोय जर्मनीत उपचार, व्हिडिओ शेअर केल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम