एकिकडे 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा प्रदर्शित करण्याला निवडणुक आयोगाने मनाई केलेली असताना दुसरीकडे राज्यात तोच न्याय गोपीचंद पडळकरांच्या 'धुमस' या सिनेमाला लावण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतलाय.
५ एप्रिलला नियोजित तारखेला 'धुमस' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. आपणच या सिनेमात काम केलं तर सिनेमा नक्की चालेल अशी खात्री वाटल्याने त्यांनी स्वतःच या सिनेमाची निर्मिती केली होती. मात्र आधी गोपीचंद निवडणुकीच्या मैदानापासून दूर होते. मात्र आठवड्याभरापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीकडून पडळकर यांना सांगलीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने सगळी समीकरणं बदलली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचा सिनेमा थिएटर्समध्ये कसा चालू द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला.
पडळकर आणि जानकर यांच्या विरोधकांनी ही बाब निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी आज त्यांना याबाबत रितसर नोटीस बजावली. यानुसार हा सिनेमा त्वरीत थिएटर्समधून मागे घेण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यासोबतच या सिनेमाच्या पब्लिसिटी आणि प्रमोशनसाठी वापरण्यात आलेलं साहित्य मागे घेण्याचे आदेशही देण्यात आलेत. याशिवाय या सिनेमाचे टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेले प्रोमोही मागे घ्यावेत असं या आदेशात नमूद करण्यात आलंय.