'गोदावरी' ही निशिकांतची कथा आहे, जो आपल्या कुटुंबापासून दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी तो पुन्हा घरी येतो. त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला 'त्या' नदीजवळ मिळणार आहेत, ज्या नदीचा त्यानं इतकी वर्षं तिरस्कार केला. आता प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२ (NYIFF) मध्ये जिओ स्टुडिओजच्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. या खास निमित्तानं 'गोदावरी' या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे औपचारिक घोषणाही करण्यात येत आहे.
या चित्रपटाचा व्हॅन्कुव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये वर्ल्ड प्रिमीअर आणि न्यूझिलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये एशिया पॅसिफिक प्रिमीअर दाखवण्यात आला. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं आहे.
'गोदावरी'विषयी निखिल महाजन म्हणाले, ''न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गोदावरी' या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड झाल्याचा खूपच आनंद आहे. हा चित्रपट आम्ही खूप सकारात्मक हेतूनं बनवला आहे. महामारीच्या काळात केवळ सोळा दिवसांत या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवल्याबद्दल मी जिओ स्टुडिओजचा खूप आभारी आहे. चित्रपट महोत्सवात 'गोदावरी'ची निवड होणं म्हणजे माझ्या पुढच्या कामासाठी ही प्रेरणादायी बाब आहे.''