मुंबई - रणवीर सिंग आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' या चित्रपटाची ९२ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीतील जगातील सर्वोत्कृष्ट आणि मानाचा समजला जाणारा असा पुरस्कार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने या चित्रपटाची दखल घेत सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या विभागासाठी या सिनेमाची निवड केली आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्याने तिचा भाऊ आणि सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर याने ट्विट करुन आपल्या बहिणीचे अभिनंदन केले आहे. तसंच चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करुन FFI चे विशेष आभार मानले आहे.
हेही वाचा -रणवीर-आलियाचा गली बॉय निघाला ऑस्करला
करण जोहर अनिल कपूर, स्वरा भास्कर, शशांक खेतान, यांनी देखील ट्वीट करुन 'गली बॉय' चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे.
'यंदा ऑस्करसाठी भारतातील २७ चित्रपट होते. त्यात 'गली बॉय' सह 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक', 'केसरी', 'बधाई हो', यांसारखे बरेच चित्रपट या शर्यतीत होते. मात्र, या सर्वांवर मात करत 'गली बॉय'ने बाजी मारली आहे, अशी माहिती FFI चे महासचिव सुपर्ण सेन यांनी दिली आहे.
यापूर्वीही मिळाले हे पुरस्कार -
याआधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गली बॉय'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही 'गली बॉय'ला मिळाला होता. धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
यापूर्वी झोया अख्तरने 'लक बाय चान्स', 'जिंदगी न मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' आदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनाची अंतिम यादी १३ जानेवारीला घोषित होणार आहे. तर, पुढच्या वर्षी ९ फेब्रुवारीला भव्यदिव्य असा 'ऑस्कर पुरस्कार सोहळा' पार पडणार आहे.
हेही वाचा -प्रियांका चोप्रा - फरहान खानची रोमॅन्टिक झलक, 'द स्काय ईझ पिंक'चं पहिलं गाणं प्रदर्शित