मुंबई -मुलींच्या भावविश्वावर आधारित 'गर्ल्स' हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'आयच्या गावात' म्हणत सर्वांना ठेका धरायला लावल्यानंतर आता 'स्वॅग माझ्या फाट्यावर' हे पार्टी साँग अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले आहे. बेधुंद होऊन प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे उत्स्फूर्त गाणे धमाल, मजामस्तीने भरलेले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात गर्ल्ससोबत बॉईझचीही धमाल पाहायला मिळणार आहे.
या गाण्यातही अंकिता लांडे, केतकी नारायण आणि अन्विता फलटणकरची अनोखी अदा पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत 'बॉईझ'चे कलाकार सुमंत शिंदे, प्रतीक लाडही या गाण्यात तिघींसोबत थिरकताना दिसतील. त्यामुळे या गाण्यात 'बॉईज'आणि 'गर्ल्स'चा जल्लोष पाहायला मिळेल. या गाण्यात आणखी एक धमाका आहे. उत्कृष्ट संगीतासोबतच संगीत दिग्दर्शक स्वप्नील यांच्या नृत्यकौशल्याची झलकही या गाण्याच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. एकदंरच 'हॅपनिंग' असणारे हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.