मुंबई -मराठी रंगभूमीवर कायमच वेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातही एखाद्या विषयाकडे बघण्याचा वेगवेगळे दृष्टीकोनही याच मराठी रंगभूमीवर पाहायला मिळतात. गांधी हत्येनंतर नथुराम गोडसेची बाजू मांडणारे 'मी नथुराम गोडसे' बोलतोय हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकाला प्रसंगी प्रखर विरोधाचा सामना देखील करावा लागला. मात्र, आता याच विषयाची थोडी वेगळी बाजू मांडणारे इतिहासातील असंही एक पान 'गांधी हत्या आणि मी' लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे. दरम्यान, 'ईटीव्ही' भारतच्या प्रतिनीधीने नाटकातील कलाकारांसोबत संवाद साधला..
'गांधी हत्या आणि मी' नाटकातील कलाकारांशी संवाद महेश डोकफोडे या तरुण लेखक दिग्दर्शकाने लिहिलेल्या या नाटकातून नथुरामने गांधी हत्या केली तेव्हा नक्की काय घटना घडल्या. तेव्हाची परिस्थिती नेमकी काय होती, गांधी हत्या झाल्यानंतर गोडसे कुटुंबीयांना नक्की कशाचा सामना करावा लागला, ते मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाटकाचं नाव जरी 'गांधी हत्या आणि मी' असं असलं तरीही गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हे नाटक तंतोतंत आधारित नसल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं आहे. अन्य १४ पुस्तक वाचून त्यातील काही तथ्यांचा या नाटकात वापर केलेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -तुमच्यात अभिनयाचा किडा वळवळतोय? तर तुमच्याचसाठी परत येतोय 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'
अभिनेता सौरभ गोखले हा या नाटकात नथुराम गोडसे यांची मध्यवर्ती भूमिका साकारत असून अभिनेता अंबरीश देशपांडे हा त्यांचा लहान भाऊ गोपाळ गोडसे यांची भूमिका करत आहे. तर, बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही सिंधू गोखले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या अलौकिक व्यक्तीमत्वाच्या भूमिका आपल्याला साकारायला मिळत असल्याचे समाधान या तिन्ही कलाकारांना आहे. त्यासोबतच प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून देत नाटकाच्या तालमी करत असल्याचं या टीमने सांगितलं आहे.
'सुयोग' या नामांकित नाट्यसमस्थेकडून हे नाटक आता व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होत असलं, तरीही यापूर्वी या नाटकाचे ११ प्रयोग झालेले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक दुसरं आलं होतं. तर आजवर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये या नाटकाला ३१ पुरस्कार मिळालेले आहेत. एवढंच काय तर, या नाटकाची जाहिरात वृत्तपत्रात आल्यापासून अनेक संस्थांनी त्यांचे प्रयोग मिळतील का, अशी विचारणा केली आहे. त्यामुळे विरोधापेक्षा हे नाटक स्वीकारलं जाण्याची शक्यता जास्त असल्याचं मत सुयोग नाट्यसंस्थेचा निर्माता संदेश भट याने व्यक्त केलं आहे.
हेही वाचा -सर्वसामान्य व्यक्तीचा असामान्य प्रवास 'लता भगवान करे' सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच
येत्या २० डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. तर २५ डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या प्रयोगाला गोडसे कुटुंबातील काही सदस्य हे नाटक पाहण्यासाठी येणार आहेत. मराठी रंगभूमीवर जेव्हा जेव्हा नथुरामने पाऊल ठेवलं तेव्हा त्याने खळबळ उडवली आहे. आता यावेळी 'गांधी हत्या आणि मी हे नाटक' नक्की काय कमाल करून दाखवतं, ते पाहणं महत्वाचं ठरेल.