झी युवा' वाहिनीवरील मानस आणि वैदेहीची प्रेमकहाणी असलेली 'फुलपाखरू' ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मानस-वैदेहीचं प्रेम जसं प्रेक्षकवर्गाला आकर्षित करतं त्याचप्रमाणे, या मालिकेचे आणखी एक आकर्षण आहे, ते म्हणजे या मालिकेत चित्रित होत असलेली गाणी!
वेगवेगळी रोमँटिक आणि मैत्रीवर आधारित गाणी या मालिकेतून अनेकदा पाहायला मिळाली आहेत. यशोमन आणि हृतावर चित्रित झालेलं आणखी एक नवीन गाणं 'फुलपाखरू' मालिकेत लवकरच पाहायला मिळेल. मंगेश बोरगावकर याने गायलेलं हे गाणं विशाल राणे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आहे. हे या मालिकेतील अठरावं गाणं आहे. एखाद्या टीव्ही मालिकेत इतकी गाणी असणं हा एक विक्रमच आहे, असं निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आवर्जून सांगितलं आहे.
मालिकेतील कॉलेज ग्रुपसोबत काही गाणी चित्रित झाल्यानंतर, पुन्हा एकदा मानस आणि वैदेही यांचं एक रोमँटिक गाणं पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नेहमीप्रमाणेच या गाण्यातून सुद्धा साध्या, सोप्या शब्दांमध्ये निखळ प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. सुंदर शब्द आणि तितकंच अप्रतिम संगीत यामुळे हे गाणं खूपच छान झालं आहे. गायक मंगेश बोरगावकर याने ते उत्तम गायलं सुद्धा आहे.