प्रभास आणि श्रध्दा कपूरचा 'साहो' चित्रपट सध्या देशभर जोरदार कमाई करीत आहे. ३५० कोटी रुपयांचे बिग बजेट असलेल्या या चित्रपटातील वेगवान अॅक्शन्स आणि स्टंट्सची चर्चाही जोरात आहे. असे असतानाच काही वादांच्या भोवऱ्यातही हा चित्रपट अडकताना दिसत आहे. अभिनेत्री लिसा रे हिने शिलो यांचे पेंटींग त्याची परवानगी न घेताच वापरल्याचा आरोप 'साहो'च्या निर्मात्यावर केला होता. आता त्याहून मोठा आरोप फ्रेंच दिग्दर्शक जेरोम साल्ले यांनी केलाय. 'लार्गो विंच' या चित्रपटाची कथा 'साहो'च्या निर्मांनी चोरल्याचा आरोप त्यांनी केलाय.
'साहो' रिलीज झाल्यानंतर भारतातील एका 'लार्गो विंच' चित्रपटाच्या चाहत्याने दिग्दर्शक जेरोम साल्ले यांना ट्विट टॅग करुन 'साहो'बद्दल कळवले होते. सुनिल यांनी केलेले ट्विट असे होते, ''आणखी एक दिवस आणि आपल्या भारतातील 'लार्गो विंच' चित्रपटाचा आणखी एक विनामूल्य मेक # साहो. तुम्हीच खरे गुरुजी आहात.''
याला प्रतिक्रिया देताना जेरोम साल्ले यांनी लिहिले, ''मला असे वाटते की माझी भारतात एक आशादायक कारकीर्द आहे.''
त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये जेरोम यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. त्यांच्या चित्रपटाची कथा चोरण्याचा हा प्रकार दुसऱ्यांदा घडतोय. यापूर्वी तेलुगुमध्ये २०१८ मध्ये 'अज्ञातवासी' हा चित्रपट बनला होता. पवन कल्याणची भूमिका असलेला हा चित्रपटही जेरोम यांची निराशा करणारा ठरला होता. या पार्श्वभूमीवर तेलुगु दिग्दर्शकाने दुसऱ्यांदा त्याच्या कथेवर बेतलेला 'साहो' हा चित्रपट बनवलाय.
जेरोम साल्ले यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, " 'लार्गो विंच'ची ही दुसरी फ्री कॉपी पहिल्यासारखीच खराब आहे. कृपया तेलुगु दिग्दर्शकांनो जर तुम्ही माझे काम चोरणार असाल तर कमीत कमी चांगले तरी करा. माझ्या भारतातील कारकिर्दीबाबतचे माझे ट्विट नक्कीच आयरॉनिक होते. यासाठी मी माफी मागतो परंतु यात मी काहीच मदत करु शकत नाही.
सध्या 'साहो'ची हवा जरी सुरू असली तरी हा चित्रपट 'लार्गो विंच' या फ्रेंच चित्रपटाची कॉपी आहे हे कळल्यावर निश्चितच आश्चर्य वाटते. फ्रेंच दिग्दर्शक जेरोम साल्ले यांनी तेलुगु दिग्दर्शकांना दिलेला सल्ला महत्त्वाचा आहे. 'नक्कल करायलाही अक्कल लागते' हेच तर त्यांना सांगायचं आहे.