मुंबई - कोरोना संक्रमणानंतर मनोरंजनसृष्टी आता सावरली आहे. निर्मातेसुद्धा आपले चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित व्हावेत यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शनाच्या तारखादेखील घोषित होऊ लागल्या आहेत. मराठी चित्रपट 'फ्री हिट दणका'ची देखील प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत 'फ्री हिट दणका'च्या टीमने हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
अपूर्वा एस. या अभिनेत्रीसोबत नायक म्हणून फॅन्ड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे दिसणार आहे. सिनेमा क्रिकेटच्या अवतीभवती फिरणारा असल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरवरुन स्पष्ट दिसते. ट्रेलरमध्ये उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. या दोन गावात वैर आहे. दोन गावात लग्न व्यवहार होत नाही. अशावेळी या दोन गावातील प्रियकर प्रेमिकांची जोडी लग्नासाठी उत्सुक आहे. याचा फैसला दोन गावाच्या संघातील क्रिकेटच्या सामन्यातून होणार आहे. असा मनोरंजक विषय असलेल्या या ट्रेलरमधील संवाद द्विअर्थी वापरलेले दिसतात. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रेक्षकांना समोर ठेवून विषयाची मांडणी करण्यात आल्याचे दिसत आहे.