मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये आपल्या मुलीच्या उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलांची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटातील नवं गाणंही प्रदर्शित करण्यात आले आहे.
'एक जिंदगी' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात वडील आणि मुलीचे भावबंध दाखवण्यात आले आहेत. इरफान खान यामध्ये अभिनेत्री राधिका मदानच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. तनिष्का संघवीने हे गाणे गायले आहे. तर सचिन जिगरने या गाण्याला कंपोज केले आहे.
मुलीचे इंग्रजी शिकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य पणाला लावणारा बाप इरफानने या चित्रपटात साकारला आहे. अत्यंत वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळते. खुसखुशीत संवाद, मिश्किल विनोद आणि खिळवून ठेवणारे कथानक अंग्रेजी मीडियममध्ये असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट जाणवते.