गेल्या काही वर्षांपासून बायोपिक आणि ऐतिहासिक चित्रपट बनविण्याकडे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचा कल दिसतोय. त्यातच शिवकालीन कथानकांना जास्त मागणी असल्याचे दिसून येतंय. अजय देवगण ने बनविलेला ‘तान्हाजी’ खूप चालला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील कथांना चित्ररूपात आणण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. त्यातील एक आहेत दिग्दर्शक अजित शिरोळे जे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक चित्रपट बनवत आहेत ज्याचे नाव आहे ‘शिवपुत्र संभाजी’.
अजित शिरोळे यांच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्याबद्दल बोलताना ते म्हणतात, “शिवपुत्र संभाजी हा माझ्यासाठी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. मी या सिनेमाची तयारी गेल्या १० वर्षांपासून करतो आहे. या सिनेमासाठी मी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके, बखरी आणि कादंबरी याचं वाचन केल आहे. एवढंच नाही तर या सिनेमाच्या स्पेशल इफेक्टसाठीही मी मेहनत घेतली आहे. दहा वर्षापूर्वी हॉलिवूडचा ‘300’ हा सिनेमा पाहिला आणि त्याच्या VFX नी मी भारावलो, आपल्या सिनेमातही अशीच भव्यता असायला हवी असं मी ठरवलं.”
कालच झालेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक अजित शिरोळे आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या बहुभाषिक चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच केलं. या सिनेमाच्या पोस्टरने अगदी कमी वेळात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आनंद पिंपळकर यांचा ‘आलंय माझ्या राशीला’ हा हिट सिनेमा अजित शिरोळे यांनी दिग्दर्शित केला होता. अजित शिरोळे यांनी १३ यशस्वी मराठी चित्रपट दिग्दर्शित केले असून आता त्यांनी हे ऐतिहासिक चित्रपटाचे शिवधनुष्य उचलले आहे. अजित शिरोळे ‘शिवपुत्र संभाजी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेत.