कोल्हापूर- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी ४ दिवसांपूर्वी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यावर धनादेश चोरीसह धान्यवाटपाच्या घोळाचे आरोप केले होते. त्यांच्या आरोपांचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी आज खंडन केले आहे. शिवाय धनाजी यमकर यांच्यावरच आता धमकी आणि बदनामी केल्याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. कोल्हापूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मेघराज भोसले म्हणाले, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि विजय पाटकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आमची बदनामी करण्याचा केलेला प्लॅन आहे. यमकर यांनी केलेल्या आरोपांची पोलीसांनी सुद्धा माहिती घेतली आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. याबाबत मी स्वतः त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यमकर यांनी धमकीचे फोन केले आहेत याबाबत सुद्धा पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे मेघराज भोसले यांनी म्हंटले आहे. शिवाय चेक चोरीचे केलेले आरोप सुद्धा खोटे असून विजय पाटकर हे धनाजी यमकर यांची ढाल करून आरोप करत आहेत. आशा लोकांमुळे महामंडळाची प्रतिमा मालिन होत आहे ती आम्ही होऊ देणार नसल्याचेही भोसले यांनी म्हंटले.