मुंबई - 'दंगल' आणि 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या दोन मोठ्या सिनेमात काम केल्यानंतर फातिमा सना शेख आगामी अनुराग बसूच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात काम करणे कमी आणि खेळणे जास्त असल्याचे फातिमाने म्हटले आहे.
फातिमाने 'दंगल' चित्रपटासाठी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. 'ठग्ज'मधील लूकसाठीही तिने खूप मेहनत केली होती. बसू यांचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्ण वेगळा असल्याचे तिला वाटते.
''मी दादांकडे ( बसू ) गेले आणि त्यांनी मला सिनेमाबद्दल ब्रीफ दिले. मी या सिनेमा काय करायचे आहे ? असे मी विचारले. त्यावर ते म्हणाले, तू फक्त सेटवर ये, आम्ही पुढचे पाहतो. मी सेटवर गेले आणि काही गोष्टींची चर्चा केली आणि प्रत्येक दिवशी ते नव्या कल्पना घेऊन येतात आणि आम्ही त्यावर फक्त खेळत असतो,'' असे फातिमा म्हणाली.
या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. परंतु ६ सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होईल. या चित्रपटात तिच्यासोबत दंगलची सहकलाकार सान्या मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, अभिषेक बच्चन आणि पंकज त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत.